Corona Remedies :शेअर बाजारातील IPO मार्केटमध्ये या वर्षात मोठी 'लाट' दिसून येत आहे. अनेक कंपन्यांचे इश्यू लॉन्च होत असून, गुंतवणूकदारांना यातून चांगला नफा मिळत आहे. आता या यादीत फार्मा क्षेत्रातील एक मोठी कंपनी सहभागी होत आहे, तिचे नाव आहे कोरोना रेमेडीज. पुढील आठवड्यात हा इश्यू सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे. खासगी इक्विटी फर्म क्रिसकॅपिटल समर्थित या इश्यूचा प्राईस बँड आणि लॉट साईजसह सर्व तपशील समोर आले आहेत.
IPO कधी उघडणार आणि किंमत किती?
कोरोना रेमेडीजचा IPO पुढील आठवड्यात ८ डिसेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल. गुंतवणूकदार या इश्यूमध्ये १० डिसेंबरपर्यंत पैसे लावू शकतील. या इश्यूचे शेअर्सचे वाटप ११ डिसेंबर रोजी होईल, तर बीएसई आणि एनएसई या दोन्ही स्टॉक एक्स्चेंजवर कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग १५ डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे.
हा IPO पूर्णपणे 'ऑफर फॉर सेल' अंतर्गत आणला जात आहे. कंपनी ६१,७१,१०१ शेअर्स विक्रीसाठी सादर करेल, ज्याचा एकूण आकार ६५५.३७ कोटी रुपये आहे. कंपनीने प्रति शेअर १,००८ ते १,०६२ रुपये असा किंमत पट्टा निश्चित केला आहे.
गुंतवणुकीचे गणित आणि लॉट साईज
या IPO साठी १४ शेअर्सचा एक लॉट निश्चित करण्यात आला आहे. याचा अर्थ, गुंतवणूकदारांना कमीतकमी एका लॉटसाठी (१४ शेअर्स) बोली लावावी लागेल. वरच्या प्राईस बँडनुसार (₹१,०६२) किमान गुंतवणूक १४,८६८ रुपये इतकी करावी लागेल. गुंतवणूकदार जास्तीत जास्त १८३ शेअर्स किंवा १३ लॉटसाठी बोली लावू शकतील, ज्यासाठी कमाल गुंतवणूक १,९३,२८४ रुपये इतकी असेल.
कंपनीच्या व्यवसायाची दमदार वाढ
अहमदाबाद येथे मुख्यालय असलेली कोरोना रेमेडीज ही फार्मा कंपनी वैद्यकीय उत्पादनांच्या निर्मितीमध्ये आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस, कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये महिलांचे आरोग्य, हृदय आणि मधुमेह काळजी यासह ६७ औषध ब्रँड्स समाविष्ट होते. क्रिसिलच्या अहवालानुसार, ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत, देशातील टॉप-३० फार्मा कंपन्यांमध्ये ही दुसरी सर्वात वेगाने वाढणारी कंपनी होती. देशांतर्गत बाजारपेठेत कंपनीचा व्यवसाय वेगाने वाढत असल्याने, हा IPO गुंतवणूकदारांना चांगली संधी देऊ शकतो.
वाचा - रुपया ऐतिहासिक नीचांकीवर; TCS झाली श्रीमंत! एकाच दिवसात २७,६४२ कोटींची कमाई; 'हे' आहे कारण?
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
